Wednesday, January 6, 2010

सोशल व्हा

आम्ही सोशल आज्ज्जिबाऽऽऽत नाही आहोत ...
त्यामुळे नुतन वर्षाच्या आरंभी आम्हाला हॅप्पी हॅप्पी असे वाटत नाही म्हणजे आनंद आजिबात होत नाही.

कधीकाळी मराठी सारस्वताने तरूणांना पेर्ते व्हा अशी ओजस्वी हाक दिली होती तद्वतच आमच्या अनेक हितचिंतकांनी आम्हाला सोशल व्हा आणि एखादा घोट घ्या अशी भावनिक साद घातली पण छ्याऽऽऽ...
तो पदार्थ नाहीऽऽऽऽ..त्रिवार नाहीऽऽऽऽ !!!

शाळेत कधीकाळी हिंदीचे अध्यापन करणारे आमचे गुरुजी यानिमित्ताने अचानक आठवले.
हिंदी शिकवित असताना कुठल्यातरी एका पाठात दवा-दारू हा शब्द आल्यामुळे आमचे बालसुलभ कुतुहल जागे झाले आणि विनाविलंब अध्यापकास आम्ही या शब्दातील दारू या शब्दाचे प्रयोजन काय असावे असा खर्डा सवाल केला.
आणि मग आमच्या मास्तरांनी आमच्या जिज्ञासू आणि विजिगिषु प्रवॄत्तीवर (आणि त्यासोबत पाठीवरदेखील ) संस्मरणीय असे प्रहार केले.
त्यावेळी शैक्षणिक जाणीवांचा यथायोग्य विकास झाला नव्हता हे आमच्यासारख्या घोर अडाण्यास-सुद्धा कबूल करावे लागेल. .
मास्तरांचे जावू द्या हो..
पण आमच्या जिज्ञासेची दिशा पाहून तीर्थरूप सुद्धा तापले होते.

या बालसंस्कारांचा असा सुरेख परिणाम झाला की पुढे महाविद्यालयातसुद्धा फ़र्मेंटेशन किंवा अल्कोहल इत्यादि पाठांना आजिबात उघडूनसुद्धा पाहिले नाही. प्रसंगी चार मार्क कमी पडले तरी बेहत्तर पण दारू अथवा मद्य अथवा अल्कोहल या शब्दांचासुद्धा वास नको असे वाटु लागले.

प्रंतु याच त्या दरिद्री आणि दळभद्री मानसिकतेने आमचे पाऽऽऽऽर वाटोळे केले. आम्हांस अगदी ऍंटीसोशल करून टाकले. आता मात्र आम्ही बदलणार.
संस्कारांची उसळी जरी आली तरी या जाहिरातीतील ( निरमा या शब्दाने जसे पाणी अलगद थांबते तसे आम्ही आमच्या विचारांस तेथल्या तेथेच दाबून ठेवणार.धान्यापासून काय काय बनवता येईल आणि त्यामुळे या देशात पुरोगामीपणाचे वारे वाहू लागतील असा विचार करणारे नेते या देशाचे भूषण आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकेका जिल्ह्यात झालेल्या मद्यविक्रीचे प्रमाण पहाता "सबसे आगे होंगे हिंदुस्तानी " असे म्हणण्यास वाईट वाटू नये.

वीज नसल्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. पाणी प्यायला मिळाले नाहीतर कुठे बिघडले? सतरंज्या उचलणा-या आणि उच्छाद मांडणा-या कार्यकर्त्यांचे पीक उदंड येवो आणि त्यांच्या दारूची सोय होवो हा आमचा प्रामुख्याने अजेंडा असला पाहिजे.

खरंय आपण एकविसाव्या शतकाकडे झपाट्‍याने चाल्लो आहोत.
हॅप्पी जर्नी.. सी या..

1 comment:

Snehit Baheti said...

its amazing sir. u r really great. i am very happy k sir aap jaise aadmi mere contact me hai