Friday, March 6, 2009

सुपरब्रेन योगा.

"शालेय जीवनात जर सर्वात महत्वाचे काही असेल तर विद्यार्थ्यास शिक्षा झाली पाहिजे"-- हा थोर विचार घेवून चालणारे शिक्षक वरचे वर दुर्मिळ होत असल्यामुळे गंभीर अडचणी उद्भवणार आहेत.

पालक मुलांना शिक्षा करू नयेत असे काही बाही बोलू लागतात आजकाल.

जरा हा व्हीडीऒ पहा म्हणजे आपल्याला कळेल की ज्याला आपणासारखे दुर्दैवी अजाण जीवजंतू , शिक्षा असा फालतू शब्द वापरतात किंवा ऊठबशी असा अविचारी शब्दप्रयोग करतात ते वास्तविक मेंदूसाठी अत्यावश्यक असणारे "सुपरब्रेन योगा" नावाचे शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक पाउल आहे.

मला स्वतःला हा व्हीडीओ पहाताना गहिवरून आले. आमचे शिक्षक हा प्रकार मेंदूविकासासाठी करत असत आणि आम्ही अजाण, पामर, अज्ञानी.... त्यास शिक्षा समजलो... शाळा आठवली.. असो...

सुखी दांपत्य जीवनातदेखील, सुपरब्रेन योगाचे विशेष महत्व आहे. विवाह करताना बुद्धी पांगुळते म्हणून पुढील जीवनात बुद्धी ताजी तरतरीत रहावी या हेतूने सुपरब्रेन योगाचा अभ्यास खटल्यासमोर म्हणजेच बायकोसमोर प्रत्येक सुखी पुरुषास करावा लाग्तो. मी नुसते हे लिहीले आहे, ते वाचूनच लाजलात आणि हसलात ना? साहजिक आहे पण असोऽऽऽऽऽ ..

इतिहासातील हा इतिहासकारांकडून उपेक्षित राहिलेला भाग असावा असे माझे स्पष्ट मत आहे. नेपोलियन , चर्चिल , मुसोलीनी सारखे जे थोर्थोर मुत्सद्दी होवून गेले त्या सर्वांना सुपरब्रेन योगा आपल्या रहात्या घरी माजघरात करावा लागला असेल. याशिवाय का ते एवढे बुद्धीमान होते???????????

अमेरिकेतील "कोंडुआत्या भातवाले उर्फ कोंडोलिझा राईस आत्या" समोर आणि बुश काकांसमोर मुशर्रफ काका आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी "सुपरब्रेन योगा" शेकडो वेळा केला असावा. त्याशिवाय का त्यांना रोज एक नवीन बुद्धी सुचते???????

तर आमचे म्हणणे असे की "सुपरब्रेन योगा" चा अंगिकार महाजालावरील तमाम बुद्धीवंतानी करायला हवा. जे करतात त्यांना हा सल्ला नाही. असोऽऽऽ. आम्ही हा प्रकार बालवयात इतके वेळा केला आहे की तेवीस, सत्तावीस आणि एकोणतीसचे पाढे सुद्धा आम्हास उत्तम पाठ झाले. काही काही शिक्षक प्राथमिक शाळेत "टेबलावर उभे करून सुपरब्रेन योगा करावयास लावित असत. त्याचा आणि केवळ त्याचाच परिणाम म्हणून आंग्लबांधवांनी पाढे न म्हणता "टेबल्स" असा शब्दप्रयोग केला असावा असे वाटून जाते मनाला !!!


कॉर्पोरेट क्षेत्र आणि तेथील काही बुद्धीमान बांधव ऑफिसात बॉसच्या केबीनात "सुपरब्रेन योगा"चे प्रयोग करतात असे ऐकून आहे. हा प्रकार ज्या कंपन्यात स्वतःला स्वाभिमानी समजणा-या पामरांनी टाळला त्यां कंपन्या "रेसेशन" चा बळी ठरल्या हे सुद्धा एक कॉर्पोरेट ट्रूथ आहे. पक्षश्रेष्ठींसमोर नेतेमंडळी सुपरब्रेन योगा करतात आणि आपले पक्षातील स्थान टिकवून ठेवतात. राजकारणात हा प्रकार नेतेमंडळीस वारंवार करावा लागतो. जनतेसमोर मात्र नेतेलोक फक्त एकदाच "सुपरब्रेन योगा" करतात आणि म्हणूनच जनता बिचारी पुढची पाच वर्षे पस्तावून हा प्रकार करत रहाते. चला निघतो आता. बायकोने बदामाचे लाडू बनवले आहेत. ते खातो नाहीतर मला सुपरब्रेन योगा करावा लागेल. ...